कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब

418

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने मोठी राजकीय झेप घेतली असून, शहराच्या नव्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापुरात पार पडलेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि रुपाराणी निकम यांची महापौर पदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. शहराच्या विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रुपाराणी निकम यांचे नेतृत्व सक्षम ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, भाजपला कोणी खुंटीवर देखील टांगायला तयार नव्हते. पण आता दिवस बदलले भाजप एक ब्रँड झाला आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपच घेणार आहे. मी आई अंबाबाईचे खूप आभार मानतो. मी साष्टांग दंडवत घालतो. कारण ब्रँडेड भाजपचा महापौर कोल्हापूर महानगरपालिकेत निवडला जात आहे. आम्ही लोकल कमिटीला सुचवा असं सांगितले होते, त्यानंतर सहा नावे सुचविण्यात आली होती. त्यातील रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचे नाव निश्चित करण्यात आले.

रुपाराणी निकम या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवताना काँग्रेसचे माजी नगरसेवक भुपाल शेटे यांचा पराभव केला होता. येत्या 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी आणि अमोल येडगे यांनी आमंत्रित केली आहे. यात निकम यांची अधिकृत निवड होणार आहे.

या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडीक, प्रदेश सचिव महेश जाधव, शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, जयंत पाटील यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.