अमली पदार्थांची तस्करी सांगली जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर इशारा
सांगली, ०१ मे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्यापासून जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. यामध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती हा महत्त्वाचा टप्पा होता. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांना सामावून घेण्यासाठी एका स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चित्रफीत, कविता, डिजिटल पोस्टर, चित्रकला, निबंध आदी सादर केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव केला. तसेच, अमली पदार्थविरोधी लढ्यात योगदान देणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सन्मानित केले. यावेळी बोलताना अमली पदार्थांची तस्करी सांगली जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाही, असा जाहीर इशारा चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पंजाबसारख्या राज्यात अमली पदार्थांचे मोठे संकट आहे. आगामी काळात तरूणांना व्यसनाधीन करणे, सायबर युद्ध अशा प्रकारात युद्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर अमली पदार्थ तस्करांना कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीने काम केल्याने सांगली जिल्ह्यात हे संकट रोखण्यात यश आले आहे. ही मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रार्थनेच्या वेळी परिपाठामध्ये अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, व्याख्यान, लघुचित्रफीत या माध्यमातून बालवयापासून अमली पदार्थांपासून दूर राहण्याच्या संस्कार रूजवण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा प्रबोधन स्पर्धा एक महत्त्वाचा भाग आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या स्पर्धा सहा प्रकारात घेण्यात आल्या. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जनजागृती झाली, असे स्पष्ट करून त्यांनी स्पर्धेतील सर्व सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन केले.
जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपले सदैव प्रयत्न असतील, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नववी आणि दहावीच्या मुलींना कर्करोगविरोधी लसीकरणासाठी प्रयत्न करू. रोजगार उपलब्धी आणि सर्वांना समान वागणूक, माणसा – माणसामध्ये समानता आदि बाबींवरही आपला भर राहील.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व या कार्यक्रमात गौरवण्यात आलेल्या पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 25 हजार रूपयांची मदत करणार असल्याचे घोषित केले. तसेच, स्पर्धेतील विजेत्या कलाकृतींची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, जाहिरात फलक, सिनेमागृह या माध्यमातून प्रसिद्धी करून व्यापक जनजागृती करण्याचे सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा ही मोहीम गेले साडेतीन महिने सुरू आहे. यामध्ये अमली पदार्थ दुष्परिणामांचा संस्कार विद्यार्थी दशेपासून शालेय स्तरावरून रूजवला जावा, यासाठी प्रबोधनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थी ही देशाची, शाळेची संपत्ती आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेतच अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगितले गेले तर भावी पिढी सुरक्षित, सदृढ आणि निरोगी राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही स्तरावर याबाबत प्रबोधन व्हावे, असे सांगून त्यांनी विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात जिल्हास्तरीय चित्रफीत, नाधमधुर कविता, डिजीटल पोस्टर, चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरणात प्राथमिक, माध्यमिक व आयटीआय विभागातील एकूण ३९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शिल्ड व रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. तसेच, “कंपोस्ट खड्डा भरा आणि आपलं गाव स्वच्छ ठेवा” या अभियानाचा पोस्टर अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आय. टी. आय. च्या प्राचार्या मेघना जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.