पिंपरी-चिंचवड मधील केशवनगर येथील मनपा शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मनपा शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा शुभारंभ आज भाजप आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते अत्यंत आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मूलभूत पाया असल्याचं यावेळी जगताप म्हणाले . केशवनगर परिसरात नव्या शाळेच्या इमारतीची उभारणी केवळ शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देणे नाही, तर भविष्यातील पिढीला सक्षम, सुसंस्कारित आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने घेतलेले ठोस पाऊल आहे. या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होतील, यावर मला पूर्ण विश्वास असल्याचे देखील मत यावेळी शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, मा.महापौर सौ.अपर्णाताई डोके, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, मोरेश्वर शेडगे, संतोष कांबळे, नगरसेविका श्रीमती अश्विनीताई चिंचवडे, सौ. माधुरी कुलकर्णी, सौ. अपर्णाताई डोके, मुख्य शहर अभियंता करंद निकम,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच महापालिकेचे पदाधिकारी, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.