भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो उल्लू ॲपने घेतला मागे

मुंबई : उल्लू अॅपवरील कंटेटवर भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी आक्रमक भूमिका वाघ यांनी घेतली होती. राजकीय वर्तुळातून देखील मोठ्या प्रमाणात या शो वर आक्षेप घेण्यात आला. या वादग्रस्त वातावरणावरून अखेर उल्लू अॅपने मोठा निर्णय घेतला आहे. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅपलिटी शोचा वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. या संपूर्ण वादादरम्यान अखेर शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मने त्यांच्या वेबसाइट आणि ॲपवरून हाऊस अरेस्टचे सर्व भाग काढून टाकले आहेत. तसेच होस्ट एजाज खानविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आल्याचे माहिती देखील समोर आली आहे. उल्लू ऍप वरून हाउस अरेस्ट हा कार्यक्रम हटविण्याबद्दल आणि या ऍपला समन्स देखील बजावण्यातआल्या बद्दल चित्रा वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत.
चित्रा वाघ यांनी म्हटले कि, उल्लू ऍप वरून हाउस अरेस्ट हा कार्यक्रम हटविण्यात आला आहे आणि या उल्लू ऍपला समन्स देखील बजावण्यात आला आहे. याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या देवाभाऊंचे मनापासून आभार मानते…महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे, आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेला खतपाणी देतात. त्यामुळेच हाऊस अरेस्ट सारखे इतर ही शो आणि ऍप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील धिंगाणा खपवून घेणार नाही आणि त्याविरोधात मी कायम आवाज उठविणार, अशी स्पष्ट भूमिका वाघ यांनी मांडली.
त्या पुढे म्हणाल्या कि, महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. हे केवळ एका शोपुरतं मर्यादित न राहता, ‘हाऊस अरेस्ट’सारखे इतर अश्लील आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील, तर त्यांच्यावरही तात्काळ बंदी घालणं आवश्यक आहे. मी देवभाऊंना विनंती करते की, उल्लू अॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. अशा अॅप्सना परवाने देणाऱ्या यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही हे नक्की, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या होत्या ?
चित्रा वाघ यांनी याबाबत काल एक्सवर ट्वीटकरत या शोवर कारवाई करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यांनी म्हटले होते कि, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!” एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे.
मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”. चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर आज या शो वर बंदी घालण्यात आली आहे.