सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान कार्यक्रमाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

सांगली : सांगली जिल्हा प्रशासकीय गतिमानता घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान कार्यक्रमाचे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . मालू हायस्कूल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात विविध तपासण्या होणार असून, तपासणी झालेल्या महिलांचे गंभीर आजार ते निरोगी अशा चार प्रकारात वर्गीकरण करून आवश्यकतेप्रमाणे आगामी चार महिने उपचार करण्यात येणार आहेत.
घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी शिबिरातून मदत होणार आहे, असे प्रतिपादन उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले. घरेलू कामगार महिलांवर उपचारासाठी अधिक गरज भासली तर विविध कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही मदत उपलब्ध करून देऊ, असे देखील त्यांनी आश्वस्त केले.
घरेलू कामगार हा इतरांची सेवा करणारा व त्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब चालविणारा वर्ग आहे. मात्र, पैसे व वेळेअभावी घरेलू कामगार महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वर्गातील महिलांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून केली जात आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अशा कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. नोंदणी झालेल्या घरेलू कामगार महिलांची आजच्या शिबिरात आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर गरजेप्रमाणे मुख्यमंत्री सहायता कक्ष, आयुष्मान भारत, धर्मादाय रुग्णालय आदि माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. अधिक गरज भासली तर आपणही विविध कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही मदत उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.
पुरेशी विश्रांती, सकस आहारअभावी महिलांच्या आरोग्याची हेळसांड होते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर महिलांना विविध आजार उद्भवतात. यावर मात करण्यासाठी पुण्यात राबवण्यात आलेल्या सुखदा उपक्रमाचा दाखला देऊन चंद्रकांत पाटील यांनी ते कोल्हापूरचे पालकमंत्री असताना पाच लाख बालकांची आरोग्य तपासणी व शंभरहून अधिक बालकांवर लाखो रुपये खर्च असलेल्या ह्रदय शस्त्रक्रिया पालकांचे भोजन, निवासाच्या सुविधेसह मोफत करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संवेदनशील संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याबद्दल कौतुक करुन घरेलू कामगार महिला आजारमुक्त होईपर्यंत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर आजार होऊ नये म्हणून, आजार झाल्यावर व आजारातून बरे झाल्यावर घ्यावयाची काळजी व आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शनानुसार पूरक आहार याबाबतही अशा शिबिरातून मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सूचित केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, सहायक आयुक्त, कामगार कल्याण मुजम्मिल मुजावर, सहायक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.