छत्रपती संभाजी महाराज जयंती : पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी

राजे संभाजीनगर (चिंचवड) : नुकतीच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ( शासकीय तारखेनुसार ) राज्यात अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानामध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी देखील शहरातील अनेक शंभू प्रेमींनी गर्दी केली होती. अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, इतिहास प्रेमी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी आवर्जून या ठिकाणी येऊन महाराजांना नमन केले.
पिंपरी चिंचवड शहरातील तमाम शिवप्रेमींच्या आग्रहाखातर बर्ड व्हॅली उद्यानामध्ये धर्मवीर,स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर प्रथमच महानगरपालिकेच्या माध्यमातून शासकीय जयंती या ठिकाणी साजरी होत असताना या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व्हावे जुमाध्यमातून त्यांचे शौर्य, धाडस, विद्वत्ता आणि राष्ट्रासाठीचे बलिदान आठवत राजांचा जाज्वल्य इतिहास युवकांसमोर तसेच शंभुप्रेमींसमोर यावा अशी इच्छा पालिका प्रशासनाकडे व्यक्त केली होती. स्थानिक नगरसेवक आणि आरंभ सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून येथे गेली पाच वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करणारे शहराचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी देखील याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.परंतु अशा प्रकारचे कोणतेही नियोजन या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नाही.
इतकेच नव्हे तर महाराजांचा पुतळा आणि चौथरा यांना अपेक्षित रंगरंगोटी करण्यात आलेली नव्हती. पुतळ्याचा मूळचा रंग (ब्रॉंझ कलर) बदलून मागील वर्षी सोनेरी रंग दिला. त्याचे अस्तर काही ठिकाणी निघाले होते. फुलांची सजावट अर्धवट होती. पुरेशी फुले व हार उपलब्द्ध नव्हते. परिसराची योग्य अशी स्वच्छता देखील करण्यात आलेली नव्हती. पूर्वनियोजित घोषित काही कार्यक्रम सुद्धा पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे होऊ शकले नाही.
पालिकाप्रशासनाची उदासीनता पाहून शंभुप्रेमी चांगलेच आक्रमक झाले त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला याबाबत जाबदेखील विचारला, त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक कसे बसे उत्तरे देत होते. पण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकालाही नाही.
शौर्याचे प्रतीक असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास भारतवर्षातील कोणीही विसरू शकत नाही. परंतु पालिकेच्या प्रशासनाला जन भावनेशी काही देणे घेणे नाही, हे त्यांच्या कृतीतून ठळकपणे जाणवले. लोकप्रतिनिधी नसल्याने मोकाट असणाऱ्या प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. हे यानिमित्ताने पुन्हा अधीरेखित झाले असल्याची अशी भावना विविध समाज संघटनांच्या आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी यांनी केली आहे.
कार्यक्रमाची पूर्व कल्पना असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून जनसामान्यांच्या भावना दुखावणारे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह जबाबदार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी शंभूप्रेमींकडून केली जात आहे.