कोल्हापूर विमानतळ होणार महत्त्वाचं हवाई वाहतूक केंद्र ! – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचाही शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला असून यावेळी जिल्ह्यातील नेते व अधिकारी उपस्थित होते. यानंतर विमानतळ संदर्भात बैठक देखील पार पडली. या बैठकीत विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण संदर्भात तसेच सध्या सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. याची माहिती मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विमानतळाचा सर्वांगीण विकास आणि विस्तार करण्यासंदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या संदर्भात मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळ येथे पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिल. कोल्हापूर विमानतळावर सध्या १९०० मीटरची धावपट्टी असून पहिल्या टप्प्यात धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. तर पुढील टप्प्यात हीच धावपट्टी ३००० मीटर पर्यंत वाढवण्याचा आराखडा तयार असल्याचे त्यांनी सांगितले. धावपट्टी विस्तारामुळे मोठ्या आकारांचे विमान उतरवणे शक्य होणार असून भविष्यात एरोब्रिजसुविधाही प्रस्तावित आहे.
मोहोळ यांनी माहिती दिली कि, कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी देशभरात टप्प्याटप्प्याने वाढत असून प्रादेशिक स्तरावरील कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव प्राप्त असून त्या संदर्भात लवकरच निर्णय होईल, असे देखील त्यांनी सांगितले.
धावपट्टी विस्तार आणि इतर कामांसाठी ६४ एकर जागेची आवश्यकता होती. पैकी ६० एकर जागा प्राप्त झालेली आहे. विस्तारीकरणासाठी २८ लाख क्युबिक मीटरचा भराव टाकून सपाट जमीन तयार करावी लागणार असून यासाठी ३२० कोटींचे इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. विमानतळावर कार्गो सुविधाही उपलब्ध केली जाणार असून यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील औद्योगिक विकासाला आणि कृषी उत्पादनाला नव्या बाजारपेठ मिळू शकतील.
कोल्हापूर येथे FTO अर्थात फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची स्थापना करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी मुंबई एव्हिएशन अकॅडमी कार्यरत आहे. MRO युनिटही केले जाणार असून यामुळे विमानांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. यसो यासोबतच इंडिगो एअरलाईन्सकडून दिल्लीसाठी स्लॉटची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर-दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणे अपेक्षित असल्याचे मोहोळ म्हणाले.