सुवर्णवीर भालाफेकपटू नीरज चोप्राने 90 मीटरचा टप्पा पार करत रचला इतिहास… नीरजच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : भारताचा सुवर्णवीर भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचत दमदार कामगिरी केली आहे. नीरजने 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली आहे . नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत त्यानं हा टप्पा पार केला आहे. या कामगिरीबद्दल देशभरातून त्याचे पुन्हा कौतुक केले जात आहे. नीरजच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे म्हणत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याचे कौतुक केले.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि, दोहा डायमंड लीग 2025 मध्ये भारताचा सुवर्णवीर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने तब्बल 90 मिटर लांब भाला फेकून स्वतःच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. कठोर मेहनत, चिकाटी आणि समर्पणभाव यांचे हे फलित आहे. नीरजच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे पाटील यांनी म्हटले.
दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला. तर, दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच 90 मीटरचा टप्पा पार केला आहे. भाला फेकमध्ये 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राच्या नावावर आता राष्ट्रीय विक्रमाची देखील नोंद झाली आहे.
नीरज चोप्राचा मागील सर्वोत्तम थ्रो त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर फेकला होता. यावेळी दोहामध्ये, त्याने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटरने सुरुवात केली होती आणि तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा ऐतिहासिक थ्रो करून विक्रम रचला आहे. नीरजने फेकलेल्या थ्रोने त्याने सर्व दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान पटकावून डायमंड लीग शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे.