आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक डंका! पुरुष आणि महिला संघांनी पटकावले सांघिक विजेतेपद; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खेळाडूंचे अभिनंदन

5

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर पुन्हा एकदा देशाचा तिरंगा अभिमानाने आणि दिमाखात फडकावला आहे. व्हिएतनाममधील दा नांग येथे आयोजित ‘२०२६ अंडर-२३ आशियाई कुस्ती स्पर्धेत’ (U23 Asian Wrestling Championship 2026) भारतीय पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती संघांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत ‘सांघिक विजेतेपद’ पटकावले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी प्रतिस्पर्धी देशांना धूळ चारत पदकांचा पाऊस पाडला:

पुरुष फ्रीस्टाईल संघ: भारतीय पुरुषांनी मॅटवर अधिराज्य गाजवत ४ सुवर्णपदकांसह एकूण ९ पदके जिंकून नवा इतिहास रचला.

भारतीय महिला कुस्तीपटूंनी अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत ६ सुवर्णपदकांसह एकूण १० पदकांची शानदार कमाई केली आणि भारताच्या क्रीडा सामर्थ्याचा ठसा उमटवला.

भारतीय खेळाडूंच्या या जागतिक यशाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या युवा कुस्तीपटूंची जिद्द, कठोर परिश्रम आणि देशासाठी सर्वोत्तम देण्याची भावना खरोखरच प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक यशामुळे भारतीय कुस्तीला जागतिक स्तरावर एक नवी आणि मजबूत ओळख मिळत आहे. या यशाचे भागीदार असलेले सर्व खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. भारताचा तिरंगा अशाच प्रकारे जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमी उंच फडकत राहो, याच सदिच्छा!

या दैदिप्यमान विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून, भारताच्या या युवा मल्लांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.