इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

17

मुंबई : दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची व स्मारकाच्या प्रतिकृतीची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी,प्रकल्प व्यवस्थापक शशी प्रभु, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, सद्यस्थितीत स्मारक इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामासंदर्भात लवकरच दिल्ली येथे प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकाचे काम वेगाने व दर्जेदार रीतीने पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहांसंदर्भात नागरिकांसाठी तेथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच तीव्र वादळांपासून स्मारकाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. तसेच स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.