महानगरपालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

99

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सुरु असताना काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यासाठी बुधवारी विविध राजकीय पक्षांतून शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश याप्रसंगी त्यांनी दिले.

महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे असतील, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली. ही सर्व कामे या माजी नगरसेवकांना समजावून सांगितली आणि ती कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

मुंबई शहर आमूलाग्र बदलत असून ते खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपाला येत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जाईल तसेच रखडलेल्या इमारतींचा शासकीय यंत्रणांच्या भागीदारीतून पुनर्विकास करण्यात येईल. ज्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येऊन राहू शकेल. या धोरणाची माहिती त्यांना यावेळी करून दिली.

शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईतील विविध विभागांच्या नियोजनासोबतच मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरिकांचे मेळावे घेऊन एक संघठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणीही मित्रपक्षांबद्दल, जागावाटपाबाबत किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे टाळण्याबाबत शिंदेंनी या बैठकीत सूचना दिल्या आहेत.

त्यासोबतच त्यांच्या विभागातील प्रश्न, त्यांच्या अडचणी यादेखील जाणून घेतल्या आणि त्या सर्व नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे आशवस्त केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे, सचिव संजय मोरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.