मंत्री चंद्रकांत पाटलांकडून कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा; समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमा मनपा अधिकाऱ्यांना केली सूचना

पुणे : कोथरूड विधानसभेचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना बैठकीत दिल्या. तसेच, पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना यावेळी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावेत. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. दूषित पाणीपुरवठा ही गंभीर बाब असून त्याचेही नियोजन करण्याची देखील सूचना यावेळी त्यांनी केली.