पंचांगकर्ते मोहन दाते यांना यंदाचा ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान

पुणे : ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, युवा उद्योजक निर्मल देशपांडे, हभप सौ. किरण कुलकर्णी, श्री शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा, पुणे (याज्ञवल्क्य आश्रम) यांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले . “ब्राह्मण रत्ने” ग्रंथाची द्वितीय आवृत्ती तथा वंदना धर्माधिकारी लिखित ‘यशोगाथा-ब्राह्मण स्त्रियांच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले .
यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, सुनंदा निसळ, उद्योजक हृषिकेश कुलकर्णी, कार्यक्रमाचे संयोजक भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे व माधुरी कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात दाते पंचांगाला 110 वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पंचांगाचा संबंध थेट खगोलशास्त्राशी असून याचा सर्व प्रकारच्या नियोजनांमध्ये प्रभावी उपयोग केला जातो. ही परंपरा यशस्वीपणे चालवणारे मोहन दाते यांना यंदाच्या ”ब्राह्मण भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . दररोज सुमारे 50 हजारांहून अधिक पोळ्यांची निर्मिती करणारा युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी हा पुरस्कार सुरु केला आहे. पुरस्काराचे यंदाचे 12 वे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी, रोख रक्कम आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आम्ही सारे ब्राह्मण या संस्थेच्या वतीने ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक गेली 20 वर्षे प्रसिध्द करण्यात येत आहे. या मासिकाच्या माध्यमातून ब्राह्मण संस्था, संघटनांचे एकत्रिकरण करण्यात येते. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात येतो. ब्राह्मण तरुणांची उद्योजकीय मानसिकता तयार करणे, नवउद्योजक निर्माण करणे तसेच ब्राह्मण उद्योजकांना सर्व प्रकारची मदत पुरवणे, हे देखील कार्य संस्थेतर्फे केले जाते.