कलिना कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे आज मुंबई विद्यापीठ येथे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान आणि संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे आणि कुलसचिव डॉ.प्रसाद कारंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कलिना कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. यासाठी जागा उपलब्ध झाली आहे अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पारतंत्र्याविरुद्ध दिलेली झुंज, त्यांचे विचार आणि साहित्य यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात अभ्यास व संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. याच परिसरात त्यांचा पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा उपलब्ध झाली आहे अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
पाटील पुढे म्हणाले, सावरकरांचे क्रांतिकारक रूप सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, जेव्हा त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले, तेव्हा त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणे आणि लिखाण करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या काळात त्यांनी सामाजिक समतेसाठी केलेले कार्य फारसे समोर आले नाही. रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या उभारणीत त्यांनी सर्व जातींसाठी मंदिर खुले केले. त्यांनी सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाहाचे आयोजनही केले. सावरकरांचे हे सामाजिक योगदान आणि विचार लोकांपुढे यावेत, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार हे अध्यासन केंद्र उभारण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सामाजिक विचार व्यापक होता. त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी ‘पतितपावन मंदिर ते चैत्यभूमी’ अशी यात्रा काढण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना म्हटले होते की, देशाला 2047 पर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर घेऊन जायचे असेल आणि प्राचीन वैभव पुन्हा मिळवायचे असेल तर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरा आणि इतिहास नीट शिकवावा लागेल. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, कवी, इतिहासकार, पुरोगामी विचारवंत आणि अग्रणी समाजसुधारक होते. ते अस्पृश्यतेच्या सामाजिक दुष्कृत्याच्या विरोधात होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीवरील कलंक मानले. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले होते. मुंबई विद्यापीठ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षणाचे स्थळ असून त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावे,असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास उलगडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये इतकी ताकद होती की, त्यांतील एक-एक पैलूंवर समग्र संशोधन करता येईल. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात स्थापन संशोधन केंद्रास आवश्यक निधी दिला जाईल.