आगामी पालिका निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे… निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कसबा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करा . विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी पालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे पाटील यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून उतरून, घरोघरी जाऊन, दिलेली जबाबदारी पार पाडावी . आगामी पालिका निवडणुकीत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे, असे पाटील म्हणाले.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे निवडणूक समिती स्थापन केली जाणार आहे. त्याच्या अध्यक्षपदी माजी सभागृहनेते गणेश बिडकर हे असणार आहेत, असेही पाटील यांनी बैठकीत स्प्ष्ट केले.
या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, शहराचे सरचिटणीस बापू मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकडे, शैलेशजी टिळक, स्वरदा बापट तसेच मंडल अध्यक्ष अमित कंक, प्रशांत सुर्वे, छगन बुलाखे व पदाधिकारी उपस्थित होते.