राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

42

सोलापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्रिशताब्दी जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध शैक्षणिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेऊन राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन केले. यावेळी विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची पाहाणी केली. तसेच इतर प्रकल्पांचे भूमिपूजन केले.

रणरागिणी, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे गोरवोद्गार राज्याचे चंद्रकांत पाटील यांनी काढले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान केंद्र व राज्य सरकारकडून त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करण्यात येत आहे. 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन एक प्रकारचा सन्मान तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून चांगली शिकवण मिळाली. पुढे त्या राज्यकारभारात व न्यायदानात पारंगत झाल्या. विद्यापीठाने त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांच्या नावाप्रमाणे साजेशे कारभार करावे. विविध नवनवीन कोर्सेस सुरू करावेत. बांधकामास व विद्यापीठाच्या विविध कामास कसलाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. यावेळी पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींचा पायाभरणी समारंभ तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.