जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळवून देण्यासाठी विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत आणि ती कामे नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

22

सांगली : सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळवून देण्यासाठी विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत आणि ती कामे नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणाऱ्या कामांचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही केले.

या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा मार्चअखेरचा खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली. तसेच 2025-26 या वर्षासाठीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

येत्या आर्थिक वर्षासाठी ₹632 कोटी 29 लाखांचा निधी मंजूर झाला असून, विशेषत: शालेय वर्गखोल्या बांधणे व दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास 100 टक्के निधी खर्च केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे यावेळी पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.

या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य व विविध जिल्हास्तरीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.