सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने, चालू शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेत प्रार्थनेवेळी ‘अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा’ व ‘विरोधी परिपाठ’ घेण्यात यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री व सेवन यावर प्रभावी कारवाई करत पोलीस विभागाने तस्करांवर चांगला धाक निर्माण केला आहे. हा कायद्याचा धाक यापुढेही कायम रहावा, अशा स्पष्ट सूचना पाटील यांनी बैठकीदरम्यान दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी, सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने, चालू शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेत प्रार्थनेवेळी ‘अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा’ व ‘विरोधी परिपाठ’ घेण्यात यावा, यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लहान वयापासूनच अमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने निश्चित केलेल्या डार्क स्पॉट्सवर सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना पाटील यांनी दिली. तसेच सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नशामुक्ती व उपचार केंद्र स्थापन करण्यासंदर्भात कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. अमली पदार्थ विरोधी लढ्यात ठोस पावले उचलण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात टॉवर पोलीस चौक्यांची उभारणी प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.