शेतकरी ‘ये रे ये रे पावसा’ म्हणतो आणि उबाठा ‘ये रे ये रे पैसा’ म्हणतो, तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी ‘एनएससीआय डोम’ येथे साजरा करण्यात आला. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहुन महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना आता मुंबईचा लढा आठवला का असा सवाल करून, आगामी निवडणुकीत मुंबईसह सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन आज पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले.
ते म्हणाले की, आपल्या लाडक्या शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. दुसरा सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांचा आहे. धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडे आहे. गेल्या ५९ वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. बाळासाहेबांचे तेजस्वी नेतृत्व आणि शिवसैनिकांचे प्रेम यामुळे शिवसेना वाढली. शिवसेना इतर राज्यांमध्ये वाढत आहे. बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, त्यामुळे आपली विजयी घोडदौड सुरू आहे.
शिंदे म्हणाले कि, निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र असल्याचा कांगावा काहीजण करतात. पण मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, असेही यावेळी ठणकावून सांगितले. कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, कचरा, मिठी नदी गाळ, रस्त्यांवर खड्डे आणि डांबरात पैसे खाल्ले तसेच मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केलात. आता मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही. आता एका डिनोची चौकशी सुरु आहे, त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा देऊन विरोधकांचा समाचार घेतला.
आपला मेळावा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपले. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे, सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार झाले आहेत.
हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीत, बॉम्बस्फोटातील आरोपीला घेऊन फिरता, आरएसएसला शिव्या देता, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकताना तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते,” असा सवालही शिंदे यांनी केला. “हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. कधीही मराठीला अंतर देणार नाही, एवढा शब्द देण्यासाठी मी आलोय, असे शिंदे म्हणाले.
शेतकरी ‘ये रे ये रे पावसा’ म्हणतो आणि उबाठा ‘ये रे ये रे पैसा’ म्हणतो. तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे. भ्रष्टाचार, लाचारी, विश्वासघात हा यांचा मूलमंत्र आहे. कचरा, डांबर, बॉडी बॅगमध्ये पैसे खातात. जनतेचा कितीही पैसा खाल्ला तरी यांचे पोट भरत नाही. किती मोठे पोट आहे, असा सवाल करत मिठी नदीच्या गाळामध्ये पैसे खाणारे मगरमिठीतून सुटणार नाही, हे लक्षात ठेवावे. दिनो मोरियाची चौकशी सुरू असून त्याने तोंड उघडल्यास किती लोकांचा मोरया होईल, असा थेट इशाराच शिंदे यांनी दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका पटवून देण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांचे या सोहळ्यात जाहीर कौतुक केले. भारतीय लष्कराने फक्त २० मिनिटांत पाकिस्तानची चरबी उतरवली. मात्र काही जण याबाबत शंका उपस्थित करून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. त्यांना ‘निशाण-ए-पाकिस्तान’ पुरस्कार द्यायला हवा असे मत व्यक्त केले.
येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा, असे आवाहन यावेळी केले. तसेच या मेळाव्यातून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ अभियानाची घोषणा केली. ‘लाडक्या सुनेचे रक्षण, हेच शिवसेनेचे वचन’ असे या अभियानाचे नाव असून हुंडा घेणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचा दृष्टीने सुरू केलेली जनजागृतीची ही एक सुरुवात असेल असे जाहीर केले.
यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.