पुणे विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वडगाव शेरी, प्रभाग क्रमांक ५ मधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न

पुणे : पुणे विकास प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शेरी, प्रभाग क्रमांक ५ मधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत विद्यार्थ्यांचा सत्कार करत गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक योगेश मुळीक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे परंपरागत शिक्षणाऐवजी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. कौशल्य विकासाला आज प्राधान्य आहे. त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केले. पाटील यांनी यावेळी पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षण यामधील फरक स्पष्ट केला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची कुवत ओळखून योग्य दिशा निवडण्याचा सल्ला दिला. याशिवाय, भविष्यातील संधींना सामोरे जाण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण आणि AI तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करण्यावर त्यांनी विशेष भर द्यावा असे सांगितले.
धीरज घाटे म्हणाले, तरुण पिढी ही देशाची संपत्ती आहे तिने देशाचा नावलौकिक कसा करता येईल या करिता काम केले पाहिजे आपल्या शिक्षणाचा देशाला, समाजाला कसा उपयोग होईल असा दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि देशासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समर्पित भावनेने काम केले पाहिजे; असे आवाहन या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांना केले.