माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

14

मुंबई : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम भदाणे, आ. अनुप अग्रवाल, आ. मंगेश चव्हाण, आ. राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजपा संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे.

या प्रसंगी पाटील यांनी सांगितले की, गेली सुमारे 75 वर्षे माझे कुटुंब काँग्रेस बरोबर आहे. खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून खानदेशचे विकासाचे मनमाड – इंदूर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, असा अनुभव आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टीची ताकद धुळे जिल्ह्यात वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू, असेही कुणाल पाटील यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उबाठा उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिष माळी, डॉ. भरत राजपूत आदींनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.