महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची ४३ वी नियामक परिषदेची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची ४३ वी नियामक परिषदेची बैठक गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अनेक विषयासंबंधी सकारात्मक चर्चा याप्रसंगी करण्यात आली.
बैठकीस राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, मंडळाचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तंत्रशिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय, अभ्यासक्रम सुधारणा, संस्थांचे कार्यप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हे महाराष्ट्र राज्याचे स्वायत्त शिक्षण मंडळ असून त्याच्या अखत्यारित पदविका शिक्षणक्रम येतात. तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि अभ्यासक्रम उद्योग-संबंधित आणि अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी १९६३ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली.