विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक योजनांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच, अमली पदार्थ प्रतिबंधासाठी देखील महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यास स्वावलंबी बनविणे व प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले असून ते 18 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. सांगली जिल्हा बार्टी, TRTI (आदिवासी विभाग), सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, यावेळी अमली पदार्थ प्रतिबंध जनजागृतीही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी लागणारा आर्थिक खर्चाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. त्यासाठी शासन विद्यार्थ्यांच्यासोबत असून बार्टी, TRTI (आदिवासी विभाग), सारथी, महाज्योती व अमृत या संस्थांमार्फत मदत केली जाते. या संस्थामार्फत प्रतिवर्षी प्रतिसंस्था 750 विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते व पुणे, दिल्ली येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठीचा खर्च शासनाच्या या संस्थांमार्फत दिला जातो. या योजनांची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार या सर्व संस्थांना एकत्र आणून त्यांच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी जिल्ह्यातील 57 महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयात व परिसरात अमली पदार्थ सेवन, विक्री होत असल्याचे आढळल्यास याबाबतची माहिती प्राध्यापकांनी तात्काळ प्रशासनास द्यावी. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. अमली पदार्थ सेवन व विक्रीवर पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक महाविद्यालये आहेत. त्यामुळे त्यांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य वयामध्ये योग्य मार्गदर्शन मिळणे फार महत्वाचे आहे. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही आवश्यक आहेत. त्यासाठी शासनाच्या विविध संस्था विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. विद्यार्थ्यांनीही याचा लाभ घ्यावा. तसेच, अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे व इतरांनाही दूर राहण्याबाबत प्रवृत्त करावे. यासाठी शिक्षक, समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, प्रशासन आपल्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले.