मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

19

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment Rules) सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागांचा पुन्हा आढावा घेऊन तातडीने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही पाटील यांनी बैठकीत दिले.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.