कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सर्वसामान्य माणसाला महागड्या उपचारांसाठी अनेकदा कर्ज काढावे लागते. मात्र आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदिंसह विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील आयुष्मान आरोग्य मंदिरच्या (प्राथमिक आरोग्य केंद्र) नवीन मुख्य इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. रवींद्र आरळी व्यासपीठावर आदि मान्यवर उपस्थित होते.
जाडरबोबलाद येथील आयुष्मान आरोग्य मंदिराची इमारत देखणी व दर्जेदार असून, या माध्यमातून सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करून चंद्रकांत पाटील म्हणाले, आरोग्य क्षेत्रावर राज्य शासनाचा भर असून, रूग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना उपचारासाठी कर्जबाजारी होण्यापासून रोखण्यासाठी आयुष्मान भारत योजनेतून वर्षाला पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही नागरिक आरोग्य सुविधापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासकीय सुविधांबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. मुंबईमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आपण परळ येथे 65 बेडची वातानुकूलित निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बारा वर्षाच्या मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जत तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या माध्यमातून जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. आयुष्मान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदिंच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक गरीब, गरजू रुग्णास चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून त्यांनी जाडरबोबलाद केंद्रास रुग्णवाहिकेचा प्रस्ताव पाठवला असून, त्यास मंजुरी मिळावी व त्यासह १०८ रुग्णवाहिका, कार्डिॲक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी हेमलता क्षीरसागर, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर तसेच विविध मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास ३ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे आरोग्य केंद्र आवश्यक वैद्यकीय साधन सामग्री व उपकरणे, फर्निचर व आवश्यक सोयीसुविधांनी सज्ज आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाडरबोबलादसह माडग्याळ, सोन्याळ, उटगी अशी चार आरोग्य उपकेंद्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे 30 हजारहून अधिक नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, जाडरबोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालय माडग्याळपासून 13 किमी अंतरावर तर जत ग्रामीण रुग्णालयापासून 38 कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.