जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही

12

सांगली : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करण्यास पालकमंत्री म्हणून आपले सदैव प्राधान्य राहील. अंमली पदार्थमुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना प्रशासनातील सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे गेल्या वर्षी अंमली पदार्थ विरोधी एकूण १३५ गुन्हे दाखल करण्यात आले. यासोबतच विद्यार्थी व युवकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन करण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. नागरिकांनीही यात योगदान देण्यासाठी व भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी सर्व सांगलीकर, जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पाटील पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकांमध्ये एक हजार 349 उद्योग उभारले आहेत. या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यात सांगली जिल्हा देशात तिसऱ्या स्थानी आहे. सांगली जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 64 हजार 146 मेट्रिक टन कृषि मालाची निर्यात केली आहे. यात फळे, भाजीपाला, अन्नधान्य व मसाला पिके यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील 3 लाख 91 हजारहून अधिक लाभार्थींना एकूण 20 हप्त्यामध्ये 1537 कोटी 60 लाख रूपये वितरीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएम कुसूम व मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांमधून सांगली जिल्ह्यात एकूण 3 हजार 265 सोलर पंप बसवले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी दुसऱ्या टप्प्यात 81 मेगावॅट क्षमतेच्या 13 सौर ऊर्जा प्रकल्पातून 60 गावातील 24 हजारहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणे शक्य झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ विस्तारीत-जत उपसा सिंचन योजनेची कामे चालू असल्याचे सांगून पाटील म्हणाले, जत तालुक्यातील पूर्णपणे व अंशतः वंचित अशा एकूण 65 गावांतील अंदाजे 26 हजार 500 हेक्टर क्षेत्र आगामी वर्षभरात सिंचित करण्याचे नियोजन आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी शाश्वत वीजपुरवठा व वार्षिक वीज खर्चात बचत करण्यासाठी संख येथे 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये एकूण ५३८ जात दाखला वितरण शिबिरे घेण्यात आली. त्यातून नागरिकांना जवळपास साडेसात हजार जातीचे दाखले वितरीत करण्यात आले. विविध सेवांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात लावलेले क्यू आर कोड स्कॅन केल्यास नागरिकांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी मिळण्यास मदत होत आहे.

तसेच सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य विभागाच्या एकूण कामास 93 कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे. कर्करोग जनजागृती वाहनाद्वारे जवळपास 7 हजार महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. तसेच, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत 591 कोटी 29 लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दल मजबूत करण्यात येत आहे. यामध्ये पावणेदोन कोटी रूपयांतून सांगली जिल्हा पोलिस दलासाठी 16 वाहने तसेच, ई ऑफिसअंतर्गत संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विविध नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख संकल्पना राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे, विश्वविक्रमी भक्तीयोग कार्यक्रमाबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व अमली पदार्थविरोधी प्रभावी कामकाजाबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.