स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, धैर्यवान माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संस्थांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

सांगली : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सांगली जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, धैर्यवान माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संस्थांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाटील यांनी त्यांचे सेवाभाव आणि योगदानाबद्दल विशेष अभिनंदन केले.
या प्रेरणादायी सोहळ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी अमली पदार्थ जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते खालीलप्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले
१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभागांतर्गत पुणे विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे व तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक व प्रमाणपत्र प्राप्त अधीक्षक सांगली जिल्हा कारागृहाचे सुभेदार सूर्यकांत पाटील, पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व इतर 8, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व इतर 4, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वश्री सिकंदर विष्णु वर्धन व इतर 4, संदीप कांबळे व इतर 5, संदीप शिंदे व इतर 8, दीपक भांडवलकर व इतर 3, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) मध्ये यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेली जिल्हा परिषद शाळा इरळीची राजेश्वरी भोसले, शिवछत्रपती विद्यालय, शिराळाचा विद्यार्थी आदित्य यादव, स्मार्ट सोलर चार्जिंग सिस्टीम फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल या उपकरणास महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निगडी, ता. शिराळाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी. घरेलू महिला कामगार मोहीम, लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया, अवयवदान मोहीम यशस्वीपणे पार पाडत असल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, आरोग्य क्षेत्रामध्ये उृत्कष्ट कामगिरीबद्दल स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब चोपडे, सन २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत १७५ लाभार्थ्यांच्या ह्रदय शस्त्रक्रिया व ४३७० लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया पूर्ण करुन महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, सांख्यिकी अन्वेषक अनिता हसबनीस, विविध कार्यक्रमांकरिता अतिरीक्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्याबद्दल १०८ रुग्णवाहिका सांगलीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ घाटुळे यांचा सन्मान करण्यात आला.
मृत्यूपश्चात अवयवदान करुन १४ लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल दिवंगत राजनंदिनी पाटील व शिवाजी नाईक यांचे वारस तसेच, अवयवदानातून दृष्टी मिळालेल्या सुमय्या शेख व अरुणिता राठोड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पातळीवर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उत्कृष्ट कामगिरी केलेले सन २०२३-२४ पुरस्कार प्राप्त यशस्वी उद्योजक अग्रणी प्लास्टीक प्रा.लि. पुणदी, ता. तासगाव व कलापि इंजिनियरींग असो.प्रा.लि. एमआयडीसी कुपवाड, ता. मिरज यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक अंतर्गत कुपवाडा जिल्ह्यातील अति उंचीच्या भागात कर्तव्य पार पाडताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्यामुळे अपंगत्व आले असल्याने मिरज तालुक्यातील आरग येथील नायक द्वारकेश बापू जाधव यांना व जम्मू कश्मिर येथे सैन्य सेवेत कार्यरत असताना शहिद झालेले खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबा शंकर भगत यांच्या पत्नी यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला.