समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग मशिन वीथ वॉटर रिसायकलिंग गाडीचे लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी करून याबाबत सविस्तर माहिती जाणून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद आदि उपस्थित होते.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीमध्ये समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथे 10 टन प्रति दिवस क्षमतेचा बायो-मिथनायझेशन प्लाँट (Bio methanation plant) उभा करण्यात आलेला आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयामधील गोळा करण्यात आलेला ओला कचरा, आठवडा बाजारचा कचरा, इत्यादी फीड म्हणून देण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारणी करीता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 3 कोटी रूपये खर्च आलेला आहे.
सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमधून 4 ते 5 टन हॉटेल वेस्ट (फक्त ओला कचरा) संकलित करण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त आठवडा बाजार मधून 4 ते 5 टन कचरा रोज संकलित करण्यात येतो. अशा प्रकारे गोळा करण्यात आलेला ओला कचरा हा बायो-मिथनायझेशन मध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यापुढे ओला कचरा बारीक करून करून, त्याला पुढे अॅनएरोबिक डाइजेस्टर (Anaerobic Digestor) मध्ये पाठवण्यात येईल. तिथे निर्माण होणारा गॅस एकत्रित करून बल्लूनमध्ये संकलित करून ठेवण्यात येईल. पुढे त्यातून 50 टक्के ते 60 टक्के शुद्धतेचा मिथेन (methane) गॅस संकलित करण्यात येणार असून पुढे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या 10 टन प्रति दिवस कचऱ्यापासून ४५० m³ ते ५०० m³ प्रति दिवस इतका बायोगॅस निर्माण होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे व पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांनी दिली.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेस महानगरपालिकेस मलवाहिन्या, भूमीगत गटार व मलसंकलन केंद्राची स्वच्छता करणाऱ्या मनुष्यबळ यांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी शासन दोन गाड्या उपलब्ध करून देणार असून यापैकी एक गाडी प्राप्त झाली आहे. या गाडीचे लोकार्पणही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या मशिनसाठी होणारा मनुष्यबळ, इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च शासनाकडून होणार आहे. हे यंत्राच्या प्रतिदिन एक पाळी (8 तास) याप्रमाणे वर्षभरात एकूण 300 पाळ्या होतील. या यंत्रासाठी आवश्यक निधी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या वस्तु सेवा कराचे अनुदान, मुद्रांक शुल्क परतावा अथवा वित्त आयोगाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून राज्यस्तरावरुन भागवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, विनायक जाधव यांनी दिली.