उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

पुणे : बाणेर येथील बंटारा भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) चा रौप्य महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.
यावेळी बोलतांना पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी एमकेसीएलने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात एमकेसीएलने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी एकेसीएलला मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे क्रेडीट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमाचे क्रेडीट्स विद्यार्थ्यांना मिळणार असून त्या विषयाचे पुढील शिक्षण घेतांना ते उपयोगात येणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकीत विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाने पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत, असेही पाटील म्हणाले.