आपत्ती स्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : कोयना व वारणा धरणातील वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या आपत्ती स्थितीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. शासन, प्रशासन नागरिकांच्या सदैव सोबत आहे. नागरिकांची सर्व काळजी घेण्यात येत असून त्यांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली, महापालिका, जिल्हा परिषद व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष फील्डवर काम करत असून, आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत ९१ कुटुंबांतील ४७१ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही आवश्यकतेनुसार स्थलांतर सुरू आहे. आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, वीज, परिवहन, बांधकाम आदी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. यासोबतच पोलीस बंदोबस्त तैनात असून, एनडीआरएफही सतर्क आहे. आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी आंतरराज्य समन्वय ठेवण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
पाटील यांनी नागरिकांना पुढील प्रमाणे आवाहन केले :
कृपया सतर्क राहा, पण घाबरून जाऊ नका.
प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा.
नदीपात्रात उतरू नका, कोणतेही धाडस करू नका.
महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केलेल्या निवारा केंद्रात वेळेवर स्थलांतरित व्हा.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.