सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील आर.सी.पी. वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनांवर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. हा कॅमेरा 360 अंशातून फिरणार असल्याने महत्वाच्या घटनेचा रिअल टाइम डाटा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विमला एम., पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णु कांबळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सांगली शहर व परिसरातील आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे तसेच मोर्चा, निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून वाहनावर दृष्टीरक्षक म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावून निगराणी वाहने अद्ययावत करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून ही वाहने अद्ययावत करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील पोलीस वाहनांवर पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे तसेच मोर्चा, निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी सांगितले.