सर्व सामान्य नागरिकांपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचवण्यासाठी कालबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली :सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचवण्यासाठी कालबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडुंना क्रीडा सुविधांचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस भरतीसह क्रीडा क्षेत्रात करियर करण्यास इच्छुक खेळाडुंना दर्जेदार क्रीडा सुविधा पुरवाव्यात. बॅडमिंटन कोर्टचे काम तातडीने सुरू होण्यासाठी कार्यवाही करावी. क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी कराव्यात. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडु व खेळातून नोकरी मिळालेल्या खेळाडुंची माहिती संकलित करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत विविध विषयांचा आढावा देखील घेतला. यामध्ये ४०० मी सिंथेटिक धावन मार्ग व नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य दर सूची मध्ये नमूद नसणारे दर विहित पद्धतीचा अवलंब करून दरपत्रक मागणी, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल आतून व बाहेरून रंगरंगोटी, जिल्हा क्रीडा संकुल परिसरात बुद्धिबळ भवन उभारणी, वास्तुविषारद नियुक्ती, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशिक्षक नियुक्ती आदिंबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदि उपस्थित होते.