दिव्यांगजनांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जावे आणि समाजात वेगळी ओळख निर्माण करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी जिल्ह्यातील १२८५ पात्र दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. अलिकडे अनेक दिव्यांग बांधवांनी आयपीएसपर्यंत झेप घेतली असून, त्यातून इतरांसाठी प्रेरणा निर्माण झाली आहे. दिव्यांगजनांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जावे आणि समाजात वेगळी ओळख निर्माण करावी, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हा दिव्यांग समन्वयक मानसिंग भोसले, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, लाभार्थी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात 42 हजारहून अधिक व्यक्तिंनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 30 हजार 521 दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. यामधील काही दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर लावल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली. याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.
दिव्यांग व्यक्तिंना या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के आरक्षण, एसटी व रेल्वेमध्ये सवलत यासह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत. या योजनांची सर्वसमावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी. शासन व प्रशासन दिव्यांगांच्या पाठिशी असून, यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
दिव्यांगांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता, शारीरिक उणिवांची खंत न बाळगता आत्मविश्वासाने जगावे, असा मूलमंत्र देताना पाटील यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाची माहिती देत उपस्थितांना प्रेरणा दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते 40 दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरूपात युडीआयडी वाटप करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास जल अर्पण करण्यात आले. दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सहकार्य केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वुई फौंडेशनचे दिनेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.