किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठी ज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण सत्र आयोजित करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

6

सांगली : सांगली जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दिवाळीनंतर ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजनासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरज लक्षात घेऊन विविध विषयांवर प्रबोधन करणारे सर्वसमावेशक मॉड्युल राबवले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, यासाठी पूर्वनियोजन काटेकोरपणे करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या प्रतिनिधी डॉ. अनघा लवळेकर, उपक्रम समन्वयक अश्विनी देशपांडे, मुख्य प्रशिक्षक दीपाली शेंडे आदि उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू करून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यात आली आहे. यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा व उपचार या त्रिसूत्रीतून काम सुरू असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रबोधनाच्या पुढील टप्प्यात ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था, पुणेच्या माध्यमातून आठवी ते दहावीतील किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मॉड्युल राबवण्यात येणार आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व खाजगी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आठवडाभरात सर्व मुख्याध्यापकांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांना पीपीटीद्वारे याबाबत माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात शनिवारी दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत पहिल्या तासात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, हे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करावे, शिक्षकांनी प्रबोधन करताना दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच, मराठीसह इंग्रजी, उर्दु, कन्नड माध्यमाच्या शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संचालक डॉ. अनघा लवळेकर म्हणाल्या, ज्ञानप्रबोधिनीचे 20 हून अधिक प्रशिक्षक एका वेळी 4 आठवड्यात शिक्षकांना प्रशिक्षण देतील. या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व भावनिक गरज लक्षात घेऊन प्रत्येक आठवड्याला सहा तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थानिक स्तरावर समन्वयक नेमण्यात येईल. तीन महिन्यांनंतर त्याचा शास्त्रीयदृष्ट्या ट्रॅकिंग केले जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.