राज्यातील 150 दिवसांच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे आज राज्यातील 150 दिवसांच्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत “विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट” तसेच सन 2029 पर्यंतचा आर्थिक आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात येते ज्यामध्ये प्रत्येक विभागाच्या एका निवडक कार्यालयाकडून आपापल्या कामाची प्रगती सादर करण्यात येते. राज्य शासनाने यापूर्वी १०० दिवसांची मोहीम राबविली होती. ज्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने उत्तम कामगिरी केली होती. या यशस्वी मोहिमेच्या पार्शवभूमीवर आता १५० दिवसांची अधिक व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग जोमाने काम करत आहे.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.