राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी यांचे निधन… मधुभाई हे संघ विचाराचे आणि संस्कारांचे विद्यापीठ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वार्धक्यामुळे गुरुवारी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांनी देहदान केले असून, तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संघाच्या येथील ‘समर्पण’ या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. मधुभाई कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त तीव्र शोकदायी असल्याच्या भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
चंद्रकांत पाटील यांनी मधुभाई कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त तीव्र शोकदायी आहे. सेवामग्नता आणि निरपेक्ष कृतिशीलता ही आदरणीय मधुभाईंची जीवन वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने संघ परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मी अभाविपच्या माध्यमातून कार्यरत असताना मधुभाईंचे बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला मिळाले. त्यांच्या मुशीत आमची जडणघडण झाली. गुजरातचे प्रांत प्रचारक असतानाही त्यांनी आपल्या संस्कारक्षम कृतीतून अनेक नेतृत्व घडवली. मधुभाई हे संघ विचाराचे आणि संस्कारांचे विद्यापीठ होते. सेवेचा संस्कार त्यांनी स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवला. त्यांचे कार्य, त्यांची तपश्चर्या आणि संघ विचारावरील निष्ठा स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
मधूभाई हे साठच्या दशकात छत्रपती संभाजीनगर येथे संघाचे प्रचारक म्हणून आले. त्यानंतर त्यांना गुजरातमध्ये पाठविण्यात आले. मधुभाई यांनी विभाग, प्रांत, क्षेत्रीय प्रचारक अशा जबाबदा-या संघात सांभाळल्या. गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळाने त्यांचे वास्तव्य छत्रपती संभाजीनगरात होते.