माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे यांचे निधन… त्यांच्या जाण्याने केवळ शैक्षणिक क्षेत्राचीच नव्हे, तर एका चिंतनशील विद्वान व्यक्तिमत्त्वाची मोठी पोकळी निर्माण झाली – मंत्री चंद्रकांत पाटील
नांदेड : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व हरपले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाघमारे सरांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, डॉ. जनार्दन वाघमारे सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि वंचितांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेला वैचारिक आवाज सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने केवळ शैक्षणिक क्षेत्राचीच नव्हे, तर एका चिंतनशील विद्वान व्यक्तिमत्त्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. वाघमारे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा दुःखद भावना पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे वाघमारे सरांचा मोठा वाटा होता. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी नेहमीच परखड मांडणी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून देखील डॉ. वाघमारे सर ओळखले जातात.