उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित ‘विकसित भारत संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

8

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित ‘विकसित भारत संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थान, मुंबई येथे संपन्न झाला. या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात भारताचे माजी एअर चीफ मार्शल (सेवानिवृत्त) विवेक राम चौधरी यांनी ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर मार्गदर्शन केले.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना पुढील २५ वर्षांचा कालखंड ‘अमृत काल’ म्हणून साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

या व्याख्यानमालेतून विकसित भारताच्या संकल्पनेवर सखोल चर्चा होऊन विद्यार्थ्यांना नव्या दृष्टिकोनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. या व्याख्यानमालेत जगप्रसिद्ध विद्वानांचे मार्गदर्शन लाभणार असून, आगामी सत्रांमध्ये अॅम्बॅसिडर लक्ष्मी पुरी, श्री.आशिष चांदोरकर, डॉ. शांतीश्री पंडित आणि श्री.मनीष दाभाडे यांचे व्याख्यान होणार आहे.

या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तसेच उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ,राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.