बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित,उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

सांगली : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य” हे ध्येयवाक्य घेऊन निरीक्षणगृहातील दीपोत्सव कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट दिली. बालगृहातील बालकांच्या आयुष्याला चांगला आकार देऊन भविष्याला दिशा देण्यासाठी काम करावे. बालगृहातील बालकांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह, सांगली येथे आयोजित आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, भारती दिगडे, बालगृहातील मुले – मुली या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
शिक्षण व नोकरीमध्ये अनाथांना एक टक्का आरक्षण असून, यातून मुलांनी चांगले करियर घडवावे, असे सांगून पाटील म्हणाले, येथील मुलांचे उत्तम संगोपन करा. चांगले शिक्षण देऊन त्यांचे चांगले करियर घडवा. त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा. त्यांच्यातील कलागुण शोधून, त्यांना वाव द्यावा. त्या अनुषंगाने काही बाह्य शिक्षण द्यावयाचे असल्यास फीची व्यवस्था करण्यात येईल.
बालगृहातील बालके व निरीक्षणगृहाच्या भौतिक अडचणी सोडवू, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, बालनिरीक्षणगृहात मुले 18 वर्षांपर्यंत राहू शकतात. 18 वर्षांनंतरच्या अनाथांची निवासव्यवस्था, महाविद्यालयीन शिक्षण, करियर, नोकरी, विवाह असे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बालगृहातील मुलांनी कोणती ही विशिष्ट वस्तु मोठ्या प्रमाणात तयार करावी. आपण दिवाळीत भेटवस्तु म्हणून देण्यासाठी ती वस्तू खरेदी करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.