महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आढावा घेतला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, चांगल्या दर्जाचे रस्ते आदि नागरी सुविधा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
महापालिकेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, जयश्री पाटील, शेखर इनामदार, समित कदम, पृथ्वीराज पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बैठकीत पाटील यांनी स्मार्ट एलईडी, पाणी योजना, ड्रेनेजसह विविध कामांचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व उपाययोजना, वारणा उद्भव योजना, सांगली व कुपवाड ड्रेनेज योजना, शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव व त्यांची सद्यस्थिती, महापालिका क्षेत्रातील रस्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ पुतळा व कमान, चौक सुशोभिकरण, पंचमुखी मारूती रस्ता, यासह छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रोईंग क्लब, गुंठेवारी प्रमाणपत्र आदिंचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेत गेल्या चार महिन्यात केलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. यामध्ये करसंकलन, दायित्त्व, घंटागाडी, सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा, रस्त्याची कामे, सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.