मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आता अतुलनगर ते वनाज मेट्रो स्थानक या मार्गिकेवरही धावणार बस… आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उपक्रमाचे लोकार्पण
पुणे : कोथरुडकरांच्या सोयीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घर ते मेट्रो स्थानक अशी मोफत शटल बस सेवा सुरू केली. या सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर अतुलनगर ते वनाज मेट्रो स्थानक या मार्गिकेवरही या सेवेला आज प्रारंभ करण्यात आला.

नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या बस सेवेचा नागरिकांना अतिशय उपयोग होत आहे. वाहतूक कोंडीतून कोथरूडकरांची सुटका करण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला. त्याला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर अतुलनगर ते वनाज मेट्रो स्थानक या मार्गिकेवरही या सेवेला प्रारंभ करताना अतिशय आनंद होत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या उपक्रमाचे लोकार्पण आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाले. ही सेवा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देऊन मेट्रोचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहित करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रा. स्व. संघाचे वारजे नगर संघचालक चित्तरंजन भागवत यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.