उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘शिक्षणवेध 2047’ या मासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड, मुंबई येथे त्यांच्या हस्ते ‘शिक्षणवेध 2047’ या मासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी संपादकीय टीमचे अभिनंदन केले.
या मासिकाच्या माध्यमातून शिक्षणातील नावीन्य, गुणवत्तावृद्धी आणि भावी पिढीच्या घडणीसाठी सकारात्मक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. विकसित शिक्षणाची दिशा आणि भविष्यातील वाटचाल या संकल्पनेवर आधारित या अंकात उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम, धोरणे, नवनवीन प्रयोग तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत उपक्रमांचे विवेचन करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे, मासिकाच्या संपादिका मृदुला बेळे तसेच संयोजक तुषार दामगुडे उपस्थित होते.