कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

21

सांगली : कवठेएकंद येथील घटनेतील काही जखमींना मिरज येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शोभेची दारू बनविताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठिशी शासन व प्रशासन आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, असा दिलासा चंद्रकांत पाटील यांनी रूग्णांच्या नातेवाईकांना दिला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, समित कदम, रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय साळुंखे, डॉ. राजकुमार खंबे आदि उपस्थित होते.

दसऱ्याच्या रात्री श्री बिऱ्हाडसिध्‍द देवाच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या आतषबाजीसाठी शोभेची दारू तयार करत असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटात जखमींपैकी गजानन यादव, विवेक पाटील, आनंद यादव, आशुतोष पाटील या रूग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी या जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या.

उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर 25 लाख रूपयांतून रूग्णालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार देयके अदा करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सदर व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संबंधितांनी अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच पूर्वपरवानगी घ्यावी, असे ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.