समाजातील वाईट प्रवृत्ती व मानसिक विकृतीचा रावण प्रत्येकाने नष्ट करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : विजयादशमीच्या निमित्ताने भाजपा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य रावण दहन सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत, सर्व उपस्थितांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. समाजातील वाईट प्रवृत्ती व मानसिक विकृतीचा रावण प्रत्येकाने नष्ट करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. दहा हजाराहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, जान्हवी किल्लेकर, अभिज्ञा भावे आणि गायक अवधूत गांधी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यास आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी वहिनी जगताप, मोरेश्वर शेडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.