रा.स्व.संघ संस्थापक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने कार्यरत ‘शंखनाद पथक’ हे अध्यात्मिक साधनेला दिशा देणारे – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाचे ३७५ वे वर्ष, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती, महात्मा जोतिबा फुले यांचे १३५ वे पुण्यतिथी वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष या सर्व ऐतिहासिक सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील केशव शंखनाद पथकाच्या १,१११ वादकांनी एकत्र येऊन विश्वविक्रमी मानवंदना दिली. या भव्य सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व वादकांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शंखनाद हा केवळ नाद नसून अध्यात्मिक साधनेचा एक प्रकार आहे. रा.स्व.संघ संस्थापक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावाने कार्यरत ‘शंखनाद पथक’ हे या अध्यात्मिक साधनेला दिशा देत आहे. या पथकाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठी तयारी करावी, असे यानिमित्ताने पाटील यांनी आवाहन केले.
या सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, विचारवंत सोपानदादा कानेरकर, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, दगडूशेठ मंडळाचे सुनिल रासने, पराग ठाकूर, निलेश पूरकर, अविनाश वाणी, रविंद्र वाणी, अनिल शितोरडकर, भूषण वाणी, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, किरण साळी, अवधूत गांधी, सुषमा नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो वादक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.