एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी शाळेचा अनोखा विश्वविक्रम… २१०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे गायले महाराष्ट्र राज्यगीत

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी या शाळेने शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी एक अनोखा विश्वविक्रम केला. शाळेच्या आवारात २१०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून महाराष्ट्र राज्यगीत गायन करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या शाळेचे नाव कोरले.
२१००+ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र राज्यगीत शाळेच्या आवारात पूर्ण अभिमानाने गायले. शाळेच्या या वेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेतली. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांनी या उपक्रमावेळी उपस्थित राहत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक देऊन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला. एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या संचालक डॉ. अॅड. ऋतुजा भोसले, प्राचार्य डॉ. प्रियंका अग्रहारी आणि मिस परमजीत कौर अरोरा यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.
पारंपारिक दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने मराठी भाषेला गौरव प्रदान करणारे हे अभिजात भाषा दर्जाचे परिपूर्ण गाणे गायिले आहे. यावेळी लहान मुलांना एकत्रित करून महाराष्ट्राचा अकरा साकारण्यात आला. या विक्रमी सादरीकरणाचा उद्देश सांस्कृतिक एकता वाढवणे आणि महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली इतिहासाला आदरांजली आहे . एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी भारतीय मूल्यांना आंतरराष्ट्रीय पद्धतींशी संतुलित करणाऱ्या बाल-केंद्रित, दर्जेदार शिक्षणाद्वारे एक नाविन्यपूर्ण शिक्षण क्षेत्र निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा अभिमान बाळगते.