सम्राट चौक मोरवाडी येथे मैला मिश्रित पाणी रस्त्यावर, नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर

52

पिंपरी : “तहान लागल्यावर आड खांदणे” हि मराठी मधील म्हण आपल्याला ठाऊक असेलच, अशीच काही परिस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलनिस्सारण विभागाची झाली आहे. गेले अनेक दिवसांपासून वारंवार सम्राट चौक मोरवाडी येथे जलनिस्सारण वाहिनी मधून मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे; पण प्रशासनाला मात्र जाग येताना दिसत नाही.

अजमेरा – मोरवाडी म्हाडा येथून येणारी जलनिस्सारण वाहिनी नुकत्याच पडलेल्या पावसाच्या सरींमध्येच ओसंडून वाहू लागली आणि मैला मिश्रित पाणी रस्त्यावर आले. तीव्र उतार त्यासोबतच या वाहिनीवर क्षमतेपेक्षा असणारा दाब आणि नागरिकांकडून टाकण्यात येणार विघटन न होणारा कचरा यामुळे हि परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. आज सम्राट चौक येथे विविध व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था, मोरवाडी कोर्ट तसेच भाजपा सारख्या राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाचे शहर कार्यालय आहे. इतकेच नव्हे तर पालिकेचे माननीय आयुक्त यांचे निवासस्थान आणि महानगरपालिकेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. तरी देखील हि बाब दुर्लक्षित होते हे नवलंच आहे . याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील चेंबरची तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पालिकेत प्रशासक असल्याने नागरिकांच्या समस्या पालिका प्रशासनाने पावसाळ्या आधी आणि प्राधान्याने सोडवाव्या हि लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित करून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये अव्वल येऊ पाहणाऱ्या प्रशासनाला केंव्हा जाग येणार का ? आणि कायमस्वरूपीचा तोडगा या प्रश्नावर निघणार का ? पावसाळ्याआधी नाले सफाईचा दावा करणारे प्रशासन याबाबत वस्तुस्थिती जाणून घेणार का ? कि पावसाळ्यात सम्राट चौक मोरवाडी हे मैला मिश्रित पाणी साठल्याने दुर्गंधी – अपघाताचे क्षेत्र बनणार हे येत्या काळात समजेल.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.