शिवसेना पक्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर… १२ नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

9

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी आज पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. गेल्या अडीच – तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. आज या प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी होईल अशी चर्चा होती, परंतु ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत पुढील सुनावणी आता १२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आज दोन्ही गटांना स्प्ष्ट केले कि तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या, अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. सध्या शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असल्याने त्यांना सुनावणीची फारशी घाई नाही. त्यामुळे शिंदे गटाने याप्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घेतली तरी चालेल, असे स्पष्ट केले. याउलट ठाकरे गटाकडून हि सुनावणी लवकरात लवकर घ्यावी असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीसाठी आग्रह धरला आहे. येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरची तारीख द्यावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली . सिब्बल यांच्या युक्तिवादावरून न्यायालयाने ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल, असे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जर खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट झाले तर नक्कीच राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी सुरू होण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.