ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाचा ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना प्रदान

15

सांगली : रंगभूमी दिनानिमित्त अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीतर्फे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपली बहुआयामी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून नीना कुलकर्णी यांना सांगलीकरांचे आराध्यदैवत श्री गणेशाची प्रतिमा भेट देत नाट्य आणि सिने क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, उपाध्यक्ष विलास गुप्ते, कार्यवाह बलदेव गवळी, कोषाध्यक्ष मेधा केळकर यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्य आणि असंख्य नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ हे नाट्य क्षेत्रातील एक अत्यंत मानाचा सन्मान आहे. यापूर्वी अनेक थोर कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्या गौरवशाली परंपरेत नीना कुलकर्णी यांचे नाव अभिमानाने जोडले गेले असल्याबाबत समाधान यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच सांगली ही नाट्यपंढरी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

नाटक ही सामुहिक कला आहे. ते एकटाचे काम नाही. विष्णूदास भावे गौरव पदक मिळाले, माझ्यासाठी ते प्रतिकात्मक आहे. यामागे रंगमंचावरील साऱ्यांचेच श्रेय आहे. गेली ५५ वर्षे रसिकांनी माझ्यावर प्रेम केले. ते वृद्धींगत व्हावे. हे गौरव पदक कलाकारासाठी पोहचपावती आहे, असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी यावेळी काढले.

मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात नीना कुळकर्णी यांचे उल्लेखनीय कार्य आहे. नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीत त्यांनी आपले बहुपरिमित आणि समृद्ध योगदान दिले आहे. अभिनयापलीकडे नीना एक प्रतिभावंत लेखिका देखील आहेत. त्यांच्या “अंतरंग” या लोकप्रिय मराठी स्तंभाचे लेख लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाले होते, ज्याचे पुस्तक रुपांतर सध्या चौथ्या आवृत्तीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.