माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून भेडसावणारा 400 कुटुंबांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी लागणार
पिंपरी -चिंचवड : पिंपरी -चिंचवड येथील प्रभाग क्रमांक – 10 विद्यानगरच्या प्रवेश कमानीपासून आयेशा मस्जिद जवळील विद्युत पुरवठा करणारी 120 MM ची जुनी केबल मागील 15 वर्षांपासून बदलली नसल्याने आणि अनेक ठिकाणी केबलचे तुकडे जोडून दुरुस्ती केल्याने, वारंवार लाईट जात असल्याची तक्रार येथील नागरिकांनी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या तक्रारीचे तुषार हिंगे यांनी त्वरित निवारण केले आहे.

विद्युत पुरवठा करणारी 120 MM ची जुनी केबल बदलून नव्याने 300 MM ची केबल टाकण्यात यावी अशी मागणी येथील सर्व नागरिकांनी, महिला तसेच युवकांनी तुषार हिंगे यांच्या केली होती. हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्याकरिता तुषार हिंगे यांनी स्वः खर्चातून आवश्यक 4 लाख रुपयांची 300 MM केबल उपलब्ध करून दिली. गुरुवारी याचे लोकार्पण तुषार हिंगे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी येथे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अनेक वर्षांपासून भेडसावणारा 400 कुटुंबांचा हा लाईटचा प्रश्न सुटणार असल्याने सर्व नागरिकांनी तुषार हिंगे यांचे यावेळी आभार मानले.